लग्नानंतर वऱ्हाडासोबत घडली मोठी दुर्घटना! बोट उलटून 200 हुन अधिक जणांचा मृत्यू

टाइम्स मराठी ऑनलाईन । लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी एखादा अपघात झाल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळतो. अनेकदा वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात झाल्याच्या बातम्या आपण पाहत असतो. लग्नानिमित्त एकाच वाहनात जास्त प्रवाशी बसल्याने अनेकदा अपघाताला निमंत्रण मिळते. आता अशीच एक घटना आफ्रिकन देश उत्तर नायजेरिया येथे घडली आहे. लग्न लावून परतत असताना वर्हाडासोबत अपघात होऊन यामध्ये २०० हुन अधिक जण असलेली बोट उलटली आहे.

   

हाती आलेल्या माहितीनुसार, उत्तर नायजेरियातील नायजर नदीवर सदरील अपघात झाला आहे. लग्न कार्य उरकल्या नंतर मोठा पाऊस सुरु झाला. यामुळे वाहनाऐवजी नदीमार्गे वर्हाडी मंडळी नाडीपल्याडच्या गावात जायला निघाले. यावेळी एका बोटीत जवळपास ३०० लोक बसले होते. क्षमतेपेक्षा अधिक लोकांच्या ओझ्याने हि बोट थोडी दबलेली होती. त्यात नदी पार करताना एका मोठ्या लाकडाला बोट धडकून अपघात झाला.

दरम्यान, या अपघातात आत्तापर्यंत फक्त ५४ लोकांना वाचवण्यात यश आल्याचे समजत आहे. ओव्हरलोडमुळे हि बोट उलटली असल्याचे प्राथमिक अंदाजात सांगण्यात आले आहे. अपघातानंतर अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतरांचा शोध सुरू आहे. हा अपघात कसा घडला याचा तपास करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.