टाइम्स मराठी । देशात गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनांचे वेड वाढतच चाललं आहे. अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत असून वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरियेण्टमध्ये आणत आहेत. इलेक्ट्रिक स्कुटर, इलेकट्रीक बाईक यानंतर आता देशातील तरुणाईचे मुख्य आकर्षण असलेली रॉयल इन्फिल्ड बुलेट आता इलेक्ट्रिक अवतारात आली आहे. बेंगळुरू स्थित बुलेटियर कस्टम्सने बुलेटचे इलेक्ट्रिक बुलेटमध्ये रूपांतर केले आहे. या इलेक्ट्रिक बुलेटला ‘Gasoline ‘ असे नाव देण्यात आले आहे.
देशातील पहिली Electric Bullet-
Gasoline ही रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक बुलेट आहे. हे इलेक्ट्रिक मॉडेल रॉयल एनफील्ड बुलेट (1984 मॉडेल) वर आधारित आहे. या इलेक्ट्रिक बाईकला बॉबर लूक देण्यासाठी चेसिसची लांबी 3 इंच करण्यात आली आहे. बुलेटचे इंजिन काढून त्याठिकाणी बॅटरी बसवण्यात आली असून बॅटरीला मोठ्या इंजिनासारखे कव्हर लावण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक बुलेट मध्ये 5kW BLDC हब मोटर आणि 72V 80Ah बॅटरी पॅक देण्यात आला आहे.ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास लागतात.
100KM पेक्षा जास्त रेंज –
Gasoline इलेक्ट्रिक Bullet मध्ये ३ वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. ही बाइक रेग्युलर मोडमध्ये 90 किमी आणि इकॉनॉमी मोडमध्ये 100 किमीपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देते. या इलेक्ट्रिक बुलेटचे टॉप स्पीड 110 किलोमीटर प्रति तास आहे. या बुलेटची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात बेल्ट किंवा चेन सिस्टीम नाही, म्हणजेच इलेक्ट्रिक हब मोटर मागील चाकामध्येच बसवण्यात आली आहे, जी थेट मागच्या चाकाला पॉवर देते. या इलेक्ट्रिक बाईकला तयार करण्यासाठीच जवळपास ३ लाख रुपये खर्च आला असल्याचे सांगण्यात येतेय.