टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज कित्येक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर तर काही थरारक अनुभव देणारे देखील असतात. असाच एक इंदोरमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओत एका कारचा तोल जाऊन ती थेट दरीत कोसळल्याचे दिसत आहे. या कारमध्ये एक १२ वर्षांची लहान मुलगी बसली होती. ती देखील कारसहीत दरीत कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रत्यक्षात घडलेल्या एका घटनेचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
हा सर्व घडलेला प्रकार इंदूरजवळील सिमरोल मधील लुधिया तलाव येथे घडला आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि तलाव पाहण्यासाठी येत असतात. असेच एक पर्यटक आपल्या बारा वर्षाच्या मुलीला घेऊन तलाव पाहण्यासाठी आले होते. त्यांच्यासह इतर लोक देखील या तलावाच्या परिसरात उपस्थित होते. या पर्यटकाने आपली कार तलावाच्यावरती असणाऱ्या काठावर लावली होती. यानंतर सर्वजण तलावात मज्जा मस्ती करण्यासाठी उतरले होते. या सर्वांनी तलावात येऊन धिंगाणा मस्ती केली.
पुढे सर्वजण मजा मस्ती करून पुन्हा तलावाच्या वरती आले. यानंतर ही बारा वर्षांची मुलगी कपडे बदलण्यासाठी कारमध्ये गेली होती. मात्र याचवेळी कार थोडी पुढे सरकल्यामुळे ती थेट समोर असलेल्या तलावात कोसळली. या कारसोबत मुलगी देखील तलावात पडले. यानंतर आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी देखील तलावात उडी मारली. ही घटना पाहून आजूबाजूचे पर्यटक देखील या दोघांच्या मदतीसाठी धावून आले. या सर्वांनी मिळून मुलीला आणि तिच्या वडिलांना तलावाच्या बाहेर काढले. परंतु या घडलेल्या प्रकारामुळे मुलीच्या मनात भिती बसली. तिला शांत केल्यानंतर तलावातून कार बाहेर काढण्यात आली.
या घडलेल्या प्रकारामुळे मुलगी आणि त्याच्या वडिलांना दुखापत झाल्यामुळे त्यांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता हे दोघे सुखरूप असून त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तसेच “अशा ठिकाणी कोणी ही कार लावू नये” अशा कमेंट्स देखील या व्हिडिओवर आल्या आहेत. सध्या या व्हिडिओला लाखोंच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत.