टाइम्स मराठी | टेस्ला कंपनी ही एक उच्च दर्जाच्या गाड्या बनविण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. कार बाजारात टेस्ला कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. आज याच कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे वित्त प्रमुख जॅचरी किरखोर्न यांनी मुख्य आर्थिक अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी वैभव तनेजा यांची पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सोमवारी शेअर बाजाराला टेस्लाने दिली आहे.
मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त झालेले वैभव तनेजा हे 2017 मध्ये टेस्लामध्ये रुजू झाले होते. गेल्या एका वर्षापूर्वी ते कंपनीच्या सोलरसिटीचे उपाध्यक्ष होते. पुढे ते कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून रुजू झाले. वैभव यांनी दोन्ही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदासाठी काम केले आहे. 2021 मध्ये वैभव यांची टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टेस्लाचे भारतीय युनिटचे संचालक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांनी कंपनीच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळेच आज त्यांची आर्थिक अधिकारी पदासाठी निवड करण्यात आली आहे.
पूर्वीचे वित्त प्रमुख जॅचरी किरखोर्न हे आता कंपनीचे मुख्य लेखा अधिकारी म्हणून काम करत राहणार आहेत. गेल्या 13 वर्षांच्या काळात एलन मस्कच्या नेतृत्वाखाली कंपनीसोबत जॅचरी किरखॉर्न यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं कंपनीनं म्हणले आहे. किरखोर्न यांनी आपले पद सोडल्यानंतर त्यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये, या कंपनीचा एक भाग बनणे हा एक विशेष अनुभव आहे आणि मी 13 वर्षांपूर्वी सामील झाल्यापासून आम्हाला कामाचा आमच्या खूप अभिमान असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सध्या टेस्ला कंपनी आपले ऑटो पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स भारतात आणण्यासाठी भारत सरकारशी चर्चा करत आहे. मुख्य म्हणजे, एलन मस्क यांची जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर ते पुढच्या वर्षी भारताला भेट देण्यासाठी येणार असल्याचे समोर आले होते. तसेच, मोदींच्या भेटीनंतर, त्यांना भारताची काळजी आहे कारण आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत असल्याचे एलन मस्क यांनी म्हणले होते.