टाइम्स मराठी । यावर्षी ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 आणि आदित्य L1 हे मिशन यशस्वीरित्या पार पाडले. या दोन्ही मिशनला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता इस्रो ब्लॅक होल चे रहस्य उलगडणार आहे. हे इस्रोचे देशातील पहिले आणि जगातील दुसरे मिशन असेल. या मिशनच्या माध्यमातून इस्रो खगोलीय घटनांसोबतच ब्लॅक होलची देखील माहिती मिळवेल. यापूर्वी ही मोहीम NASA ने देखील राबवली होती. त्यानंतर आता इस्त्रो हे मिशन लॉन्च करणार आहे.
काय आहे हे मिशन
हे भारताचे महत्त्वकांक्षी मिशन असेल. या मिशनचे नाव एक्स- रे पोलरीमेट्री आहे. हे सॅटेलाईट मिशन असून या मिशनच्या माध्यमातून खगोलीय स्रोतांबद्दल माहिती मिळेल. त्याचबरोबर या मिशनमध्ये POLIX आणि XSPECT हे दोन पेलोड्स देखील असतील. इस्रो कडून या मिशनवर बऱ्याच दिवसांपासून काम चालू आहे. एक्स- रे पोलरीमेट्री मिशन बाबत ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी स्वतः माहिती दिली होती. हे मिशन या वर्षाच्या अखेरीस सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.
या तारखेला प्रक्षेपित होणार मिशन
ISRO चे हे महत्वकांक्षी मिशन या वर्षाच्या अखेरीस प्रक्षेपित करण्यात येणार होते. आता इस्रोने एक्स -रे पोलरीमेट्री मिशनची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार हे मिशन 28 डिसेंबर पर्यंत प्रक्षेपित केले जाईल. क्ष किरण स्त्रोत आणि ध्रुवीकरणाचा तपास करणे हे या मिशनचे महत्त्वाचा उद्देश असेल. यासोबतच या मिशनच्या माध्यमातून खगोल शास्त्रातील रहस्य सोडवण्यासोबतच टाईम डोमेन अभ्यास आणि स्पेक्ट्रोस्कोपीवर या गोष्टीवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल.
या खगोलीय रहस्यांचा शोध
एक्स-रे पोलरीमेट्री हे भारताचे खूप खास मिशन असेल. इस्रो ने दिलेल्या माहितीनुसार हे मिशन न्यूट्रॉन तारे, गॅलेक्ट्रीक न्यूक्लि, पल्सर विंड नेब्युला, ब्लॅक होल यासारख्या खगोलीय रहस्यांचा शोध घेईल. या मिशनच्या माध्यमातून भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतील. चांद्रयान प्रमाणेच हे मिशन देखील यशस्वीरित्या पार पडण्याची शक्यता आहे.