जिचे अंत्यसंस्कार केले तिचाच Video Call आला अन्….; कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली

टाइम्स मराठी | बिहारमधील एका गावात अंत्यसंस्कार करण्यात आलेली मुलगी जिवंत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित प्रकरणात मृत मुलीचे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसामध्येच मुलीच्या वडिलांना तिचा फोन आला. यानंतर तिने आपण जिवंतच असल्याची माहिती कुटुंबाला दिली. ज्यामुळे सर्वच कुटुंबियांना दिलासा मिळाला. आता पोलीस अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मुलीचा तपास करीत आहेत. या मुलीचा मृतदेह त्यांना पाण्यात बुडलेल्या अवस्थेत सापडला होता. ज्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे शक्य झाले नाही. तसेच एका दुसऱ्याच कुटुंबाने या मृतदेहाला आपली मुलगी समजून अग्नी दिली.

   

समोर आलेल्या माहितीनुसार, बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यातील अकबरपुरमधील अंशू कुमारी नावाची मुलगी गेल्या एक महिन्यापासून गायब झाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबियाने तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारावर मुलीचा शोध सुरू होता. मात्र एके दिवशी अचानक जिल्ह्यातील एका पाण्याच्या डब्यात मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा मृतदेह पूर्णपणे फुगला असल्यामुळे तो नेमका कोणाचा आहे याचा तपास पोलिसांना घेता आला नाही.

मुलीचा वडिलांना व्हिडीओ कॉल

मात्र मुलीच्या वयाच्या अंदाजानुसार आणि तिने घातलेल्या कपड्यांवरून हा मृतदेह अंशु कुमारीच असल्याचे कुटुंबीयांना वाटले. त्यामुळे पुढे या मृतदेहावर अंशूच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. मात्र या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतर अंशू कुमारीचा आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल आला. यावेळी तिने आपण एका मुलासोबत पळून गेलो आहोत आणि मी जिवंत असल्याची माहिती तिने वडिलांना दिली. हे ऐकून घरच्यांना देखील धक्का बसला. परंतु आपली मुलगी जिवंत असल्याचा देखील त्यांना तितकाच आनंद झाला.

दरम्यान, या सर्व घटनेनंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मुलीचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे. हा मृतदेह नक्की कोणाचा आहे याबाबत पोलिसांच्या हाती कोणतीही माहिती लागलेली नाही. मुख्य म्हणजे, मृतदेहाची ओळख न पडल्यामुळे यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये तर मृत व्यक्तीच परत घरी आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेकांनी पोलिसांवर तसेच रुग्णालयांवर गंभीर आरोप लावले आहेत.