टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे जनसामान्य नागरिकांचा कल इलेक्ट्रिक गाड्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव जणसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्यामुळे रोजच्या महागाईपासून सुटका मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. अशातच आता सरकार देखील या इलेक्ट्रिक वाहनासाठी खास निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता येणाऱ्या काळात सार्वजनिक सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते. नुकतच निती आयोगाचे माजी CEO अमिताभ कांत यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठी विधान केलं आहे. 2030 पर्यंत सर्व दुचाकी इलेक्ट्रिक असाव्या असं त्यांनी म्हंटल आहे.
गोव्यामध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखालील ऊर्जा संक्रमणावरील कार्य गटाच्या चौथ्या बैठकीत त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी अमिताभ कांत म्हणाले की देशाने 2030 पर्यंत सर्व प्रकारच्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले पाहिजे. यामध्ये 65% सार्वजनिक वाहनांना इलेक्ट्रिक रूपात तयार करणे गरजेचे आहे. यासाठी धोरणात्मक व्यवस्था आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
अमिताभ कांत पुढे म्हणाले की, भारतामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी आपण आपले पर्यावरण चांगले ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पेट्रोल डिझेलच्या वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे. जगभरातील इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेने आता एक कोटींचा टप्पा ओलांडला असून ज्या काही नवीन गाड्या बाजारात येत आहेत त्यापैकी 18 टक्के वाहने इलेक्ट्रिक आहे. या इलेक्ट्रिक कार आणि टू व्हीलर च्या वाढत्या विक्रीमुळे पेट्रोल आणि डिझेल कार आता कमी होताना दिसत आहेत.