भारतात Bentley ची सेडान Flying Spur Hybrid कार लॉन्च; किंमत 5.25 कोटी रुपये

TIMES MARATHI | लक्झरी वाहन उत्पादक कंपनी Bentley ने आपली नवीन लक्झरी सेडान Flying Spur Hybrid भारतात लॉन्च केली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.25 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ही अल्ट्रा लक्झरी सेडान पूर्वी V8 आणि W12 इंजिनांसह लॉन्च करण्यात आली होती, परंतु आता कंपनीने प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनसह कार सादर केली आहे. या नविन सेडानला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळेल अशी आशा कंपनीला आहे.

   

कस्टमायझेशन

Flying Spur Hybrid सेडान भारतात केवळ गुरुग्राम स्थित एक्सक्लुझिव्ह मोटर्सद्वारे विकली जाणार आहे. जे Bentley चे देशातील एकमेव आउटलेट आहे. इतर बेंटलींप्रमाणेच, फ्लाइंग स्पर हायब्रिड देखील अनेक सानुकूलित पर्यायांसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये 60 पेक्षा जास्त कलरचा पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, यामध्ये म्युलिनर आणि टेलर-मेड फिनिशचा देखीलसमावेश आहे.

फिचर्स

Bentleyने इंटीरियरसाठी कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध केले आहेत. ज्यामध्ये डॅशबोर्डसाठी लेदरच्या 15 शेड्स आणि आठ कलर पर्यायांचा समावेश आहे. ग्राहक उच्च दर्जाचे डायमंड जडलेल्या आरामदायी सीट, लोगो आणि थ्रीडी लेदर डोअर पॅनेलसोबतच सीट देखील निवडू शकतात. या कारमध्ये बाहेरील व्हिज्युअल हायलाइट्समध्ये गडद टिंट ट्रीटमेंटसह मॅट्रिक्स ग्रिल, वर्तुळाकार एलईडी हेडलाइट्स, क्रिस्टलसारखे डीआरएल, 10-स्पोक 22-इंच अलॉय व्हील आणि स्क्वेअर-आउट एलईडी टेललाइट्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, फ्लाइंग स्पर हायब्रिडमध्ये 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 21-चॅनेल साउंड सिस्टम, पॅनोरामिक सनरूफ आणि मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग आहे.

पॉवरट्रेन

नवीन Flying Spur Hybridमध्ये पॉवरसाठी 2.9-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आहे. जे 18 kWh बॅटरीसह जोडलेले आहे. हे इंजिन 5500-6500 rpm वर 410 bhp पॉवर आणि 2000-5000 rpm वर 550 Nm टॉर्क जनरेट करते. इलेक्ट्रिक मोटरसह प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन 536 bhp पॉवर आणि 750 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच ही कार 4.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम आहे. ती 285 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

किंमत

नुकत्याच लॉन्च झालेल्या Flying Spur Hybrid कारची किंमत तब्बल 5.25 कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही कार मर्सिडीज-बेंझ एएमजी-जी 63, अॅस्टन मार्टिन व्हँटेज, मर्सिडीज-बेंझ मेबॅक एस-क्लासशी स्पर्धा करेल. सध्या तरी ही कार ग्राहकांच्या पसंतीत पडताना दिसत आहे.