टाइम्स मराठी | सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळख असलेल्या बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने आता 4G आणि 5G सेवा सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी लागणारी जमीन राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे लवकरच 20,000 टॉवरच्या माध्यमातून 34000 गावांमध्ये 4G सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. बीएसएनएलचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी जालना येथे एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, बीएसएनएल आता पूर्वीप्रमाणे काम सुरू करू शकेल आणि त्याचबरोबर बीएसएनएलचे ग्राहक देखील वाढण्यास सुरुवात होईल. जालना जिल्ह्यामध्ये बीएसएनएलच्या सेवांचा आढावा घेण्यासाठी रोहित शर्मा आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
रोहित शर्मा पुढे म्हणाले की, बीएसएनएलचे 4G आणि 5G ही टेक्नॉलॉजी भारतातच डेव्हलप करण्यात आली असून टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारा भारत हा जगातील पाचव्या नंबरचा देश ठरला आहे. मार्केट कंट्रोल आणि प्राईज वार थांबण्यासाठी बीएसएनएल ची सेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. बीएसएनएल सुरू झाल्यावर देशात सर्वात स्वस्त आणि किफायतशीर सेवा कंपनी देऊ शकेल असा विश्वास केंद्र सरकारला आहे. भारतामध्ये बीएसएनएलच्या 4G आणि 5G सेवेला या वर्षीच मंजुरी मिळाली होती. त्यानुसार आता ज्या गावांमध्ये 4G चे सिग्नल मिळत नाही अशा 34000 गावात बीएसएनएलची 4G सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन टेक्नॉलॉजी मुळे आता जास्त मनुष्यबळाची गरज नसून बीएसएनएल आता कमी मनुष्यबळाचा वापर करत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या इमारती रिकाम्या झाल्या आहे. म्हणून जालना येथील टेलिफोन भावनातील खालचा मजला भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रोहित शर्मा यांनी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यांमध्ये 4G आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी 2800 गावांमध्ये नवीन टॉवर्स उभारले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या 4G आणि 5G सेवेसाठी टॉवर उभारले जाणार असल्याचं महाप्रबंधक संजय केशवानी यांनी सांगितलं. त्याचबरोबर आता बीएसएनएल देत असलेली सेवा चांगल्या प्रकारे कशी देता येईल यासाठी प्रयत्न देखील करत असल्याचे सांगितलं.