बुरखाबंदीमुळे मुंबईतील कॉलेजमध्ये वातावरण तापलं; नेमकं काय घडलं?

टाइम्स मराठी । गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये बुरखा बंदी (Burqa Ban) मुळे बराच मोठा वाद झाला होता. या वादानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा तसाच वाद निर्माण झाला आहे. मुंबई (Mumbai) येथील चेंबूर भागात आचार्य महाविद्यालयमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणवेश सक्ती करण्यात आली असून बुरखा वर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे तर दुसरीकडे कॉलेज प्रशासन बुरखा घालणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी देणार नाही यावर ठाम असल्याचं दिसत आहे.

   

चेंबूरच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स मध्ये गणवेश सक्ती करण्यात आली आणि बुरखा घालून येण्यास मनाई करण्यात आली. आचार्य कॉलेजने घेतलेल्या या निर्णयामुळे मुस्लिम विद्यार्थिनींनी कॉलेज परिसरात नाराजी व्यक्त करत आंदोलन केले. या आंदोलनाला वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी देखील पाठिंबा दिला. आम्हाला महाविद्यालयाच्या गणवेश बद्दल कोणताही प्रॉब्लेम नसून महाविद्यालयां मध्ये प्रवेश केल्यानंतर हवं तर बुरखा काढून ठेऊ असं विद्यार्थिनींनी सांगितलं. त्या म्हणाल्या की कॉलेजच्या आत मध्ये गेल्यावर बुरखा काढण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी बुरखा काढून ठेवतील. परंतु यावर देखील महाविद्यालयाच्या प्रशासनाने नकार घंटा वाजवली. यामुळे महाविद्यालयाच्या मेन गेटवर वातावरण पेटले होते.

आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या काही मुस्लिम विद्यार्थिनी कॉलेजच्या मेन गेटच्या आत आल्यावर बुरखा काढून ठेवतात. परंतु आता यावर देखील महाविद्यालयाच्या प्रशासनाने बंदी घातली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस या परिसरात दाखल झाले आणि पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली.