Hydrogen Car : शेतकऱ्याच्या लेकाने बनवली हायड्रोजनवर चालणारी कार; देते दमदार मायलेज 

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव आणि वाढती महागाई यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे कल वाढला आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा अप्रतिम पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनां सोबतच ग्रीन हायड्रोजन वाहन (Hydrogen Car) देखील आता लॉन्च करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रयत्न करत आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये हायड्रोजन वर चालणारी बस सुरु करण्यात आली होती. आता महाराष्ट्रातील एका शेतकरी पुत्राने घरीच हायड्रोजन वर चालणारी कार बनवली आहे. शेतकऱ्याच्या लेकाने बनवलेली ही कार जबरदस्त मायलेज देते.

   

या शेतकरी पुत्राने बनवली हायड्रोजन वर चालणारी कार- Hydrogen Car

चंद्रपूर जिल्ह्यात राहणाऱ्या हर्षल नकशा या शेतकरी पुत्राने ही हायड्रोजन वर चालणारी कार (Hydrogen Car) डेव्हलप केली आहे. ही कार बनवण्यामध्ये त्याला यश आले असून ही AI पॉवर हायड्रोजन कार आहे. या कारची चाचणी, आणि प्रोटोटाइपची टेस्टिंग देखील त्याने केली आहे. एवढेच नाही तर कार बनवणाऱ्या हर्षल ने स्वतःचे वर्कशॉप देखील बनवले आहे. या वर्कशॉप मध्ये ही कार डेव्हलप करण्यात आली. या कारला हर्षल ने सोनिक वन असं नाव दिलं असून ही कार हायड्रोजन वर चालते. हर्षल ला ही कार तयार करण्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च आला. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचं कौतुक केलं.

डिझाईन

हायड्रोजन वर चालणाऱ्या (Hydrogen Car) या सोनिक वन नावाच्या कारचे दरवाजे हे लंबोर्गीनी प्रमाणे दिसतात. या हायड्रोजन कारचा रिअर आणि फ्रंट लूक अप्रतिम दिसतो. हर्षल ने या कारला अप्रतिम डिझाईन आणि लुक दिला आहे. या डिझाईन आणि लुक मुळे ही कार ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करेल. हर्षल ने या कार मध्ये बरेच सेल्फ ड्रायव्हिंग फीचर्स उपलब्ध केले आहे.

देते एवढे मायलेज

सोनिक वन या हायड्रोजन कारला पूर्णपणे मंजुरी मिळाल्यानंतर आणि कारची चाचणी, ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर रस्त्यावर धावेल. सध्या तरी हायड्रोजन कारच्या प्रोटोटाईप मॉडेल्स ला रस्त्यावर धावण्यास मंजुरी देण्यात आलेली नाही. परंतु भविष्यात हायड्रोजन कारला चांगली पसंती मिळू शकते. इलेक्ट्रिक वाहनां प्रमाणे हायड्रोजन कारकडे देखील ग्राहकांचा कल वाढू शकतो. खास म्हणजे या कार मध्ये 150 रुपयांचे हायड्रोजन टाकल्यानंतर ही कार 300 km पर्यंत प्रवास करू शकते. म्हणजेच  50 पैसे प्रति किलोमीटर असे दमदार मायलेज ही कार देते.