Indian Railway: आता रेल्वेचं तिकीट काढताच मिळणार 10 लाखांचं सुरक्षा कवच, किंमत फक्त 35 पैसे

Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये प्रवाशांनी तिकीट बुक करताच त्यांना रेल्वे विमा सुरक्षा मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना खूप कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत. थोडक्यात सांगायचे झालेच तर, रेल्वेने IRCTC कडून तिकीट बुक (Ticket Booking) करताना दिलेली विम्याची सुविधा बाय डीफॉल्ट उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आता प्रवाशांना या सुविधेसाठी वेगळा पर्याय निवडावा लागणार नाही.

   

इथून पुढे तिकीट बुक करताना विमा सुरक्षा (Insurance Policy) पर्याय हा आपोआप निवडला जाणार आहे. या सुविधेअंतर्गत रेल्वे अपघात झाल्यास प्रवाशांना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. विम्याची किंमतही केवळ ३५ पैसे आहे. आतापर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची ही सुविधा ऐच्छिक होती आणि तिची निवड ही प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून होती. मात्र आता इथून पुढे कंपल्सरी हा पर्याय निवडला जाणार आहे.

यापूर्वी मोठ्या संख्येने प्रवासी या विमा सुविधेचा निवड करत नव्हते. त्यामुळे आता इथून पुढे प्रवाशांचे हित लक्षात घेऊन ही सुविधा स्वयंचलित करण्यात आली आहे. त्यामुळे आता तिकीट बुक करायच्या वेळी विमा सुरक्षा योजनेचा पर्याय आपोआप निवडला जाणार आहे. या विमा सुरक्षा योजनेअंतर्गत प्रवासादरम्यान रेल्वेचा अपघात झाल्यास प्रवाशाला १० लाख रुपये संरक्षण मिळणार आहे.

परंतु जर एखाद्या प्रवाशाला या विमा सुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर तो व्यक्ती हा पर्याय सोडून पुढचा पर्याय निवडू शकतो. यासाठी त्या व्यक्तीला ऑप्‍ट आउट ऑप्‍शन पर्याय निवडावा लागेल. तसेच या व्यक्तीला रेल्वे अपघातात विभागाकडून कोणतीही संरक्षण सुरक्षा देण्यात येणार नाही. पर्याय न निवडलेला व्यक्ती संरक्षण विमा योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

यासंदर्भात माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, बालासोर दुर्घटनेतून समज घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. IRCTC कडून हा विमा घेतल्यावर SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे विमा संरक्षण दिले जाणार आहे. गेल्या महिन्यात बालासोर दुर्घटनेत २८८ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. तर १००० हून अधिक लोक जखमी झाले होते. यातील अनेक प्रवाशांनी विमा सुरक्षा योजनेचा लाभ घेतला नव्हता.