टाइम्स मराठी । मागील आठवड्यात देशातील आघडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि VI ने मोबाईल रिचार्ज च्या किमतीत मोठी वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. आधीच महागाईने हैराण झालेला देशातील सर्वसामान्य नागरिक आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतीने चांगलाच संकटात सापडला आहे. अशावेळी कमीत कमी पैशात जो रिचार्ज उपलब्ध आहे तो मारण्याकडे ग्राहकांचा कल आहे. मात्र आता जिओ ने (Jio) आपल्या ग्राहकांना डबल धक्का देत स्वस्तात असलेले १४९ आणि १७९ रुपयांचे रिचार्ज बंद केलेत. त्यामुळे सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांना याच्यापेक्षा जास्त किमतीचा रिचार्ज करावा लागणार आहे.
TelecomTalk च्या रिपोर्टनुसार, कंपनीने 149 आणि 179 रुपयांचे रिचार्ज ऑप्शन काढून टाकले आहे. याचा अर्थ आउटगोइंगसाठी जर तुम्हाला तुमचं सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर याच्यापेक्षा जास्त किमतीचा रिचार्ज मारावा लागणार आहे. जिओ कंपनीच्या या निर्णयामुळे ज्या ग्राहकांना कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन हवे आहेत त्यांना धक्का बसणार आहे. कारण कंपनीच्या या निर्णयानंतर ग्राहकांना सर्वात सवस्त रिचार्जसाठी 189 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस असून या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 2GB इंटरनेट, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 300 SMS चा लाभ घेता येतोय. खरं तर या रिचार्ज प्लॅनची (Jio Recharge Plan) किंमत सुद्धा आधी 155 रुपये होती, जी 3 जुलैपासून 189 रुपये झाली आहे
दरम्यान, जिओच्या इतर प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगायचं झाल्यास, याआधी जो रिचार्ज 209 रुपयात होता त्यासाठी आता ग्राहकांना 249 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तर 239 रुपयांचा 28 दिवसांचा प्रीपेड रिचार्ज आता 299 रुपये झाला आहे. तर 349 रुपयांचा रिचार्ज आता 399 रुपये आणि 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आता 449 रुपयांत मिळेल. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी आर्थिक झळ बसणार हे नक्की….