खडकवासल्यात राजकीय भूकंप होणार? शरद पवार गटाचा माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जोरदार इनकमिंग सुरु असताना खडकवासल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक सचिन दोडके मात्र भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. याला कारण ठरलंय सचिन दोडके यांनी संघाच्या पथसंचलनाचे केलेले स्वागत. विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस. या निमित्ताने संघाकडून शहरात पथसंचलन करण्यात येते. सचिन दोडके यांनी वारजे येथे होणाऱ्या पथसंचलनाचे स्वागत करत या पथसंचलनात सहभागी होण्याचे आवाहन समाजमाध्यमातून केले आहे. त्यामुळे सचिन दोडके हे भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा रंगली आहे.

   

संघाच्या पथसंचलनाचे स्वागत करून दोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून घेतल्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सचिन दोडके आणि भाजपचे भीमराव तापकीर यांच्यामध्ये झालेल्या लढतीत अवघ्या काही मतांनी दोडके यांचा पराभव झाला होता. सध्या मतदारसंघात विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्याविषयी नाराजी असल्याचे दिसून येतेय. त्यामुळे भाजपकडून नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात असल्याचे समजते. या घडामोडी पाहता सचिन दोडके यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, खडकवासला मतदारसंघ 2009 मध्ये स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. मात्र, 2011 मध्ये त्यांच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणूक झाली. भाजपने नवोदित व माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली, तर त्यांच्या विरोधात रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे उभ्या होत्या. तापकीर यांनी वांजळे यांचा अवघ्या ३,६२५ मतांनी पराभव करून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला. आजसुद्धा खडकवासला हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.