श्रीरामांचा 108 फूट सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार; अमित शहांनी केली पायाभरणी

टाइम्स मराठी । भगवान श्रीराम (Lord Shriram) हे हिंदू धर्मातील दैवत म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर भगवान श्रीरामांना नारायणाचा सातवा अवतार मानले जाते. आता लवकरच श्रीरामांच्या 108 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळा असेल. आंध्र प्रदेशामधील कुरनूर या ठिकाणी या पुतळ्याची उभारणी करण्यात येणार असून देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची पायाभरणी केली आहे. यावेळी श्री राघवेंद्र स्वामी या मठाचे प्रमुख सुबुधेंद्र तीर्थ, जय श्रीराम फाउंडेशनचे संस्थापक रामू आणि श्रीधर, राज्यमंत्री जी.जयराम, भाजपचे नेते टी. जी. व्यंकटेश यांची उपस्थिती होती.

   

अमित शहा यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. आपल्या ट्विट मध्ये अमित शाह म्हणतात, आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे श्री राघवेंद्र स्वामी मठात उभारल्या जाणाऱ्या प्रभु श्री रामचंद्रजींच्या १०८ फूट उंच पुतळ्याची पायाभरणी केली. भारतातील सर्वात उंच असणारा प्रभू रामाचा विशाल पुतळा शहरात भक्ती भावना निर्माण करेल आणि लोकांना आपल्या समृद्ध आणि कालातीत सभ्यतावादी मूल्यांप्रती त्यांच्या बांधिलकीविषयी अटूट राहण्याची प्रेरणा देईल. श्रीराम यांचा पुतळा पूर्ण झाल्यास मंत्रालयाम हे जागतिक अध्यात्मिक पर्यटन केंद्र बनेल त्याचबरोबर श्रीरामांच्या पुतळ्यामुळे सनातन धर्माचा संदेश वर्षानुवर्षी अवघ्या जगाला मिळणार असून परंपरा जास्त दृढ होणार आहे असे देखील ते म्हणाले.

दरम्यान, आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम सुद्धा नुकतंच पूर्ण झाले असून दुसऱ्या मजल्याचे देखील काम सुरू करण्यात आले आहे. हे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर जानेवारीला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर राम लल्लांचा अभिषेक देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच प्रकारे आता आयोध्या आणि आंध्र प्रदेशात सुरू करण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या जन्मभूमीचे आणि श्रीरामांचा विशाल मूर्तीचे काम लवकरच पूर्ण होऊन भाविक भक्तांसाठी ही आनंदाची बातमी असेल.