NASA च्या शास्त्रज्ञांना सापडला पृथ्वीपेक्षाही 8 पट मोठा ग्रह; जीवसृष्टी असण्याची शक्यता

टाइम्स मराठी । ISRO आणि NASA च्या माध्यमातून सतत वेगवेगळे शोध लावले जातात. अंतराळात काय सुरू आहे, कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर पाणी उपलब्ध आहे अशा सर्व गोष्टींचा शोध नासा आणि इस्रो कडून लावला जातो. सध्या चंद्रावर ऑक्सीजन, हायड्रोजन, पाणी, जीवसृष्टी या सारख्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या ठिकाणी असलेल्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ISRO कडून चांद्रयान तीन हे मिशन पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर आता NASA च्या वैज्ञानिकांनी एका विशाल ग्रहाचा शोध लावला आहे. आणि हा ग्रह संपूर्ण पाण्याने भरलेला असल्याचं नासाने सांगितलं आहे. एवढेच नाही तर या ग्रहावर मानवी जीवन जगण्यासाठी उपयुक्त असलेले रसायनही असल्याचे संकेत नासाने दिले आहे.

   

कोणता आहे तो ग्रह

नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या एका ग्रहावर मिथेन आणि कार्बन डाय-ऑक्साइड असलेले काही रेणू उपलब्ध असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. सूर्यमाले बाहेर असलेला तो ग्रह म्हणजे K2-18 b हा आहे. हा ग्रह एक हायसिन एक्सो प्लॅनेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु नासाकडून अजूनही या ग्रहाचा शोध सुरू आहे.

हायसिन एक्सो प्लॅनेट म्हणजे काय

हायसिन एक्सो प्लॅनेट म्हणजेच असा ग्रह ज्या ठिकाणी हायड्रोजन आणि संपूर्ण पाण्याने भरलेला पृष्ठभाग उपलब्ध आहे. K2-18 b नावाच्या या ग्रहावर पूर्णपणे पाणी आणि हायड्रोजन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 120 प्रकाश वर्ष दूर स्थित आहे. तसेच हा ग्रह पृथ्वीपेक्षा 8.6 पट मोठा ग्रह असून हा राहण्या योग्य क्षेत्रात थंड बटू ताऱ्या भोवती फिरतो. K2-18 b या ग्रहावर अभ्यास करण्यासाठी खगोल शास्त्रज्ञांना प्रचंड रस वाटत आहे. कारण या ठिकाणी कार्बन युक्त रेणूंचा शोध लागला आहे. या ग्रहावर असलेल्या हायड्रोजन समृद्ध वातावरणाच्या खाली महासागर असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर असलेल्या डायनामिथाईड सल्फाईड हे रसायन या ग्रहावर आहे का याचा शोध देखील शास्त्रज्ञ घेत आहे.

शास्त्रज्ञांना संशोधनातून मिळालेली माहिती आशादायक असली तरीही या ग्रहावर जीवसृष्टी बाबत अनिश्चितता दर्शवण्यात येत आहे. या ग्रहाच्या आकारावरून असे लक्षात येते की, या ग्रहाच्या आतल्या भागात नेपच्यून सारखा उच्च दाबाच्या बर्फाचे आच्छादन असू शकते. त्याचबरोबर हायड्रोजन समृद्ध वातावरण आणि सागरी पृष्ठभाग देखील या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवसृष्टी या ठिकाणी उपलब्ध असेल की नाही याबाबत अजून अभ्यास करावा लागणार आहे. त्यानुसार नासाची टीम अजून संशोधन करण्याची योजना आखत असून या संशोधनातून आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.