Netflix युझर्सला मोठा धक्का! आता Password शेअरिंग ऑप्शन कंपनीकडून बंद

टाइम्स मराठी । भारतामध्ये नेटफ्लिक्सवरील वेब सिरीज पाहणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच आजवर कित्येक जणांनी एका व्यक्तीला नेटफ्लिक्सचा रिचार्ज करायला सांगून सर्वांनी एकच पासवर्ड वापरायची पद्धत वापरली आहे. यामुळे एका व्यक्तीच्या रिचार्जवर दोघेजण सहज नेटफ्लिक्स वापरू शकत होते. मात्र इथून पुढे आपल्याला ही पद्धत राबवता येणार नाही. कारण की, नेटफ्लिक्सने आता पासवर्ड शेअरिंग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच २० जुलैपासून पासवर्ड शेअरिंगवर बंदी आणली आहे.

   

कंपनीच्या या निर्णयामुळे नेटफ्लिक्स पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा वैयक्तिक रिचार्ज करावा लागणार आहे. नेटफ्लिक्सचा हा नियम भारतासह अमेरिका आणि इतर देशात लागू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्स तोट्यात जाताना दिसत आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवरील सक्रिय सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नेटफ्लिक्सचे रिचार्ज १४९ पासून सुरू आहेत. तर नेटफ्लिक्सच्या टॉप प्लॅनची किंमत ६४९ रुपये आहे. हा रिचार्ज करून युजर्स नेटफ्लिक्सचे सदस्य होऊ शकतात.

आता इथून पुढे कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा पासवर्ड वापरून त्याच्या आयडीवरून नेटफ्लिक्स चा लाभ घेता येणार नाही. नेटफ्लिक्स कडून या सर्व गोष्टींची पडताळणी करण्यात येईल. नवीन आयडी आणि पासवर्ड शिवाय कोणालाही नेटफ्लिक्सचा कंटेंट पाहता येणार नाही. असे केल्यामुळे नेटफ्लिक्सवरील वापरकर्त्यांची संख्या वाढेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

नविन नियमानुसार, नेटफ्लिक्स वापरताना प्राथमिक खात्याचे वाय- फाय नेटवर्क 31 दिवसांतून एकदा तरी कनेक्ट करावे लागणार आहे. दरम्यान वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगचा ऑप्शन दिला होता. यामुळे कोणताही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा पासवर्ड वापरून नेटफ्लिक्सवरील कंटेंट पाहू शकत होता. मात्र हीच बाब नेटवर्कसाठी तोट्याची ठरली आहे. या कारणामुळे नेटफ्लिक्सने हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.