शिक्षकांकडूनच मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करण्याचे आदेश; Viral Video पाहून तुम्हालाही येईल संताप

टाइम्स मराठी | देशातील वेगवेगळ्या भागातून जातीय अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहेत. आता अशीच नुकतीच एक उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे घटना घडली आहे. येथील एका शाळेत इतर मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानफटात लावल्याचा प्रकार शाळेतील शिक्षकाकडून घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर, या शिक्षकाच्या अटकेची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर विरोधकांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

   

सदर व्हिडिओतून समोर आले आहे की, शाळेतील शिक्षिका मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान करत आहे. तसेच, वर्गातील इतर मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगत आहे. यानंतर इतर विद्यार्थी देखील शिक्षकांचे ऐकून त्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या कानफडात लगावतात. या सर्व घडलेल्या प्रकारानंतर मुस्लिम विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शाळेतून दाखला काढून घेतला आहे. तसेच प्रवेश शुल्क परत केल्यानंतर शाळेवर कोणतीही कारवाई करणार नाही असे सांगितले आहे. तर संबंधित शिक्षिकेकडून विद्यार्थ्याची माफी मागण्यात आली आहे.

मात्र या व्हिडिओमुळे आता संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या व्हिडिओतून मुस्लिम समाजाबाबत पसरत चाललेला द्वेष दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून योगी सरकारवर टीका होत आहे. तसेच, मुस्लीम समाजाबाबत द्वेष पसरवणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम संघटनांकडून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाढत जाणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे याविरोधात सरकार नेमकी काय भूमिका घेते आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुख्य म्हणजे, या सर्व घडलेल्या प्रकाराची माहिती देताना एसपी सत्यनाराणय प्रजापत यांनी सांगितले आहे की, शाळेतील शिक्षिका मुस्लिम विद्यार्थ्यांच्या लक्षात गणिताचा पाढा न राहिल्यामुळे त्याला इतर मुलांकडून मारहाण करण्यास सांगत होती. यानंतर त्या शिक्षिकेचे ऐकून इतर मुलांनी देखील मुस्लिम विद्यार्थ्याला मारले. या व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह शब्दही ऐकू येत असल्यामुळे पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत. याप्रकरणी शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकांची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, मुस्लिम विद्यार्थ्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या या व्हिडिओनंतर काँग्रेस नेते ला राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्विट करून, “एका शिक्षकाकडूनच निष्पाप मुलांच्या मनात भेदभावाचे विष ओतणे जात आहे. शाळेसारख्या पवित्र स्थानाला द्वेषाचा बाजार बनवला जात आहे. हे भाजपने पसरवलेले द्वेषाचे केरोसिन असून यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आग लागली आहे. मुलं देशाचे भविष्य आहेत. त्यांचा द्वेष करू नका, सर्वांना मिळून प्रेम शिकवायचे आहे” असे म्हणले आहे.