टाइम्स मराठी । आजकाल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्ली सारख्या शहरांमध्ये आपण सतत हवा प्रदूषणाच्या घटना ऐकत असतो. यासोबतच मुंबई मधून देखील हवा प्रदूषणाच्या घटना यावेळेस मोठ्या प्रमाणात ऐकू आल्या होत्या. आता हवेतील प्रदूषणाची पातळी, हवेत प्रदूषण करणारे वायू, हवा श्वास घेण्या योग्य आहे की नाही, किंवा या ठिकाणी राहणे योग्य आहे की नाही अशा प्रश्नांची सर्व उत्तरे सांगणारे यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र एखाद्या शास्त्रज्ञांनी नाही तर चक्क खानदेशातील प्राध्यापकांनी विकसित केले आहे. यासोबतच हवेतील प्रदूषणाची पातळी आणि प्रदूषण करणारे वायू सांगणाऱ्या यंत्राच्या प्रतिकृतीला भारतीय पातळीवर पेटंट मिळाले आहे.
कस आहे हे यंत्र
खानदेशातील तळोदा या गावातील प्राध्यापकांनी हे यंत्र बनवले आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे या प्राध्यापकांना यंत्राच्या प्रतिकृतीला पेटंट मिळवण्यात देखील यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी या प्राध्यापकांचे कौतुक होत आहे. आपल्याला बऱ्याच शहरांमधील हवेची गुणवत्ता घसरल्याच्या घटना ऐकू येत असतात. अशा ठिकाणी श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होतो. यासोबतच खेड्या गावात देखील जेव्हा बंद खोलीमध्ये एखादा कार्यक्रम घेतला जातो, त्या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यामुळे प्रदूषणाचा त्रास निर्माण होतो. खास करून हिवाळ्यामध्ये हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. बऱ्याच शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घटल्याचे देखील घटना उघड होत असतात. या सर्व बाबींचा विचार करून या प्राध्यापकांनी हे यंत्र विकसित केले आहे.
या प्राध्यापकांनी विकसित केले यंत्र
खानदेशातील अमळनेर येथील प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. घनश्याम जगताप, अमळनेर येथील प्रा. डॉ. पी. एस पाटील, चोपडा महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल निकम आणि खानदेशातील तळोद्यातील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश गायकवाड यांच्या ग्रुपने शहरात वाढत असलेली प्रदूषणाची समस्या, या समस्येच्या माध्यमातून मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम यावर उत्तर म्हणून बंद खोलीत किंवा नियंत्रित वातावरणातील हवा प्रदूषणाची पातळी ओळखणाऱ्या यंत्राच्या प्रतिकृतीचे भारतीय पातळीवर पेटंट घेण्यामध्ये यश मिळवले आहे.
भविष्यात प्रदूषणाची पातळी ओळखण्यास मदत होईल
समाजकार्य महाविद्यालयामध्ये काम करत असताना समाज आणि पर्यावरण यासाठी जागरूक राहून या ग्रुपने खास प्रयत्न करून हे यंत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विकसित केलेले हे यंत्र भविष्यात वातावरणातील प्रदूषणाची पातळी आणि प्रदूषणाचे घटक यांची ओळख होईल आणि यावर उपाय योजना करता येणार असल्यामुळे या सर्व प्राध्यापकांचे कौतुक होत आहे.
काय म्हणाले प्राध्यापक
समाजकार्य विभागांमध्ये असल्यामुळे प्रदूषणाच्या समस्यांवर नेहमी चर्चा केली जाते. यामध्ये सामाजिक आणि पर्यावरणीय जाणीवेतून प्रदूषणाची ओळख करून देणाऱ्या यंत्राबद्दल आम्ही चर्चा केली. आणि या चर्चेमधूनच यंत्राची निर्मिती झाली. यासोबतच आता पेटंट मिळणार असल्यामुळे यातील संशोधनाला गती मिळेल असं तळोदाचे प्राध्यापक निलेश गायकवाड यांनी सांगितलं.