Satara News : विद्यार्थ्यांकडून खोट्या तक्रारी लिहून घेईन अन् तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करिन, मुख्याध्यापकाची शिक्षकांना धमकी

टाइम्स मराठी ऑनलाईन (Satara News) : विद्यार्थ्यांकडून खोट्या तक्रारी लिहून घेईल अन तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करीन अशी धमकीच मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिल्याचा प्रकार कराड तालुक्यात घडला आहे. एका प्रतिष्ठित संस्थेच्या उंब्रज येथील मोठ्या शाळेत झालेल्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. भर मीटिंगमध्येच मुख्याध्यापाकांनी शिक्षकांना कारण नसताना धमकी दिल्याने अशा मुख्याध्यापकांवर लगाम कोण लावणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

   

राजकारणातील नीतिमत्ता ढासळलेली असताना आता शिक्षणक्षेत्रातही वाचाळवीरांना सहन करणे समाजाच्या भविष्यासाठी नक्कीच परवडणारे नाही.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेत अनेक आदर्श शिक्षक आहेत. झोकून देऊन काम करणाऱ्या आणि तळमळीने शिकवणाऱ्या अशा शिक्षकांमुळेच एक चांगला समाज घडत असतो. शिक्षकांवर समाज घडवण्याची मोठी जबाबदारी असते. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी खोट्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून लिहून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे लज्जास्पद आहे.

वांझ जनावराला सुद्धा पाणा फुटेल इतकी ताकद माझ्यात आहे अशा शब्दांत मुख्याध्यापकाने मीटिंगमध्ये म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोलण्याचा समंजसपणाच नसलेला व्यक्ती उंब्रज येथील मोठ्या शाळेचे प्रशासन कसे हाताळू शकतो असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला आहे. आपल्या बेताल वक्तव्यांची मालिकाच या महाशयांनी सुरु केली असून आपण शिक्षक आहोत हजाम नाही असं जातीवाचक विधान एका महिला शिक्षिकेला केल्याचंही बोललं जात आहे. (Satara News)

दरम्यान, लहान मुलं हि देवाघरची फुलं असतात असे आपल्या संस्कृतीत म्हटले जाते. मात्र शाळेतील या विद्यार्थ्यांकडूनच खोट्या तक्रारी लिहून घेईन अन फौजदारी गुन्हे दाखल करेन अशी धमकी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच दिल्याने खळबळ उडाली आहे. अशा मुख्याध्यापकांवर संस्थेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. राजकारणातील नीतिमत्ता ढासळलेली असताना आता शिक्षणक्षेत्रातही वाचाळवीरांना सहन करणे समाजाच्या भविष्यासाठी नक्कीच परवडणारे नाही. तेव्हा आता यावर पुढे काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.