तुमचाही लहान मुलगा Mobile साठी सतत हट्ट करतोय? अशा प्रकारे मोडा सवय

टाइम्स मराठी । आजकाल लहान मुलं मैदानी खेळ खेळताना नाही तर मोबाईल घेऊन गेम खेळताना जास्त दिसतात. शाळा सुटल्यावर मुलं पूर्वी खेळ खेळण्यासाठी मैदानात, सोसायटीच्या गार्डनमध्ये जात असत. पण आता चित्र बदलल्याचं दिसतंय. शाळेतून आल्यावर आज-काल मुलं स्मार्टफोन घेऊन स्किन समोर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना स्मार्टफोन वापरण्याची प्रचंड सवय होते. एवढेच नाही तर 1-2 वर्षाची मुलं देखील शहाण्या माणसांसारखी मोबाईल हाताळताना दिसतात. अनेकदा तर लहान मुलांना जेवण करताना देखील मोबाईल शिवाय जेवण जात नाही. जर आपण या लहान मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला की ते रडायला लागतात. त्यामुळे आई-वडील देखील त्यांना शांत करण्यासाठी मोबाईल फोन देऊन जेऊ घालतात.

   

पण सतत लहान मुलांजवळ मोबाईल देणे, जेवताना देखील मोबाईलचा वापर करणे यामुळे लहान मुलांना मोबाईलची सवय लागते. ही सवय अत्यंत वाईट असून मोबाईल मुळे लहान मुलांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. जर तुमच्या घरातही एक दोन वर्षाचे मुलं सतत मोबाईलच्या वापरामुळे मोबाईलच्या आहारी गेले असतील तर तुम्हाला त्यांची ही सवय सोडावी लागेल. त्यासाठी तुम्ही खालील काही उपाय करू शकतात.

१) मुलांना समजावून सांगणे-

मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम लगेच होतो. ते बरेचदा मूड असला की तुम्ही सांगितलेलं ऐकूनही घेतील. तर बऱ्याचदा चिडचिड देखील करतील. मुलांची ही मोबाईलची सवय सोडण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर त्यांना समजून सांगणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही मुलांना तुमच्याजवळ बसवून समजावून सांगा. परंतु मुलांच्या हातात मोबाईल असताना तुम्ही हे समजवणार असाल तर त्यांची चिडचिड होईल.

२) कृतीतून समजावणे –

लहान मुलं सर्वात जास्त मोठ्यांचे अनुकरण करूनच शिकतात. त्याचप्रकारे जर तुम्ही लहान मुलांच्या समोर मोबाईलचा वापर टाळल्यास त्यांना समजून सांगण्यापेक्षा कृतीतून ते लवकर शिकतील. आणि तुम्ही मोबाईल फोन न वापरता लहान मुलांसोबत टाइम्स स्पेंड करून खेळलात तर हळूहळू ते मोबाईल फोन वापरणं विसरून जातील.

३) कामात गुंतवा –

जर तुम्ही लहान मुलांना कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवलं तर ते मोबाईलच्या विचारापासून लांब जातील. आणि हळूहळू त्यांची सवय देखील मोडेल. जर तुम्ही आई असाल तर किचन मध्ये लहान मुलांना घेऊन काहीतरी काम सांगा. त्या कामात गुंतल्यामुळे त्यांना मोबाईलचा विसर पडेल.

४) गप्पा मारणे-

बऱ्याचदा लहान मुलं जेवण करत असताना मोबाईल हवा म्हणून हट्ट करत असतात. आणि बराच वेळ रडतात. अशावेळी आई-वडिल त्यांचा हट्ट पूर्ण करून शांत बसावा म्हणून मोबाईल देऊन टाकतात. पण त्यांना याची सतत सवय लागते. त्यामुळे जेवण करताना तुम्ही त्यांचं मन वळवून गप्पा मारल्यास ते हळूहळू मोबाईलचा हट्ट सोडतील.