महाविकास आघाडीत काँग्रेस- राष्ट्रवादीकडून ठाकरेंची कोंडी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असल्याने नेहमीच त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं.. मात्र सध्याच्या राजकारणात ठाकरेंची वाटचाल सहानभुतीकडून अनुभूतींकडे जात असल्याचे चित्र आहे. त्याला कारण आहे मागील काही वर्षात आणि खास करून २०१९ नंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि उलथापालथी… 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भाजपा महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागा असे 161 जागांचे बहुमत महायुतीला मिळाले. पण परिस्थितीचा अचूक फायदा घेत उद्धव ठाकरेंनी ठी कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी संधान साधले आणि थेट मुख्यमंत्री बनले. उद्धव यांना ना धड सरकार चालवता आले, ना पक्ष टिकवता आला. पण महाराष्ट्राच्या राजकारणात चिरंतन टिकणारी अस्थिरता ठाकरेंनी निर्माण केली.

   

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर करण्यात आला. मात्र आज त्याच दगाबाजीची फळे उद्धव ठाकरेंना भोगावी लागत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने उद्धव ठाकरेंना अपमानित करण्यात येत आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका करत परतीचे दोर कापून टाकलेत. आणि हाच मुद्दा पकडून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून ठाकरेंना आणखी कोंडीत पकडलं जात आहे. उद्धव ठाकरेंना सुद्धा नाईलाजाने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. सरकार तर त्यांना चालवता येत नव्हतेच, शिवाय उद्धव यांना संसदीय शिष्टाचार देखील माहिती नव्हते. प्रश्नावर त्यांची अजिबात मांड नव्हती. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे अवघे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले होते. विधिमंडळात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याचे सौजन्य देखील उद्धव यांनी कधी दाखवले नाही. उद्धव यांच्या मर्यादांवर शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती” या पुस्तकात मार्मिक भाष्य केले आहे. “दोन वर्षात उद्धव ठाकरे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले. ही बाब आमच्या अनुभवी लोकांच्या पचनी पडणारी नव्हती” अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव यांची शाळा घेतली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाबतीत सर्वात कमकुवत कामगिरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आहे. या निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या त्यातून हेच स्पष्ट होते की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी स्वतःच्या विस्तारासाठी उद्धव ठाकरे यांचा वापर करून घेतला आहे. एकीकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंपेक्षा कमी जागा लढवून सुद्धा जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले तर दुसरीकडे ठाकरेंना मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते म्हणावी तशी ठाकरेंच्या उमेदवाराला ट्रान्सफर झालीच नाही. त्याउलट शिवसैनिकांनी मात्र आघाडी धर्म पाळून काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली आणि त्यांचे जास्तीत जास्त खासदार निवडून सुद्धा आणले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीने जी दगाबाजी केली त्याचीह्क पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे चिंतेत आहेत.

त्यामुळेच कि काय उद्धव ठाकरें मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावायला निवडणुकीआधीच दिल्लीत गेले मात्र तिथेही त्यांना अपशय आल. कॉंग्रेस आणि गांधी परिवाराचे निष्ठावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही, असे थेट सांगून उद्धव यांच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे. ज्याच्या पक्षाला जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनीही उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तशीच भूमिका घेतली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार) गटात वाहत असलेल्या वार्यांची दिशा पाहून संजय राऊत यांनीही आपली तलवार म्यान केली आहे.

सत्ता मिळण्याची आशा होती तेव्हा उद्धव हे कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी महत्वाचे होते. पण आता मात्र उद्धव ठाकरेंचा महत्व न देण्याचे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीने ठरवल्याचे दिसत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव यांनी आपल्या पक्षातून चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि विशाल पाटील निवडून देखील आले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठींबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी परस्पर आपले स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरला आणि नार्वेकर निवडून आले. शरद पवार यांच्या उमेदवाराला त्यामुळे नामुष्की पत्करावी लागली. पवार यांनी घडल्या प्रकारावर जाहीर नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने न मिळणारी सत्ता तब्बल अडीच वर्षे उपभोगली. आपापले पक्ष भक्कम केले. रसद जोडली. उद्धव यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्यांना पालख्या वाहाव्या लागल्या. पक्ष उद्धव ठाकरे यांचा फुटला. लोकसभा निवडणुकीत उद्धव यांची मते कॉंग्रेस राष्ट्रवादीने खेचून नेली. बदल्यात उद्धव यांना कटोरा दिला. आता विधानसभेच्या तोंडावर उद्धव यांना अधिकाधिक कमजोर करून जास्तीच्या जागा पदरात पाडून घ्यायच्या हा कॉंग्रेसचा डाव आहे आणि त्या डावाला शरण जाण्याशिवाय उद्धव यांना अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही असच सध्याचे राजकीय चित्र आहे.