टाइम्स मराठी । दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचे प्रतिसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटत असतात. त्याचप्रकारे सोशल मीडियावर एका घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एका गर्भवती महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली. सदर घटना ही राजस्थान मधील असून राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत दखल घेत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ राजस्थान येथील प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. 31 ऑगस्ट रोजी एका गर्भवती महिलेला तिच्या पतीने विवस्त्र करून संपूर्ण गावामध्ये तिची धिंड काढली होती. या महिलेचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. या महिलेचा जवळच्या गावात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. असे असताना ती चार दिवसांपूर्वीच प्रियकरासोबत पळून गेली. ही संपूर्ण घटना तिच्या कुटुंबाला कळताच त्यांनी या महिलेचा पाठलाग करून तिला पकडलं. आणि तिला गावामध्ये आणण्यात आले. त्याचवेळी महिलेला तिच्या पतीने विवस्त्र केले. आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर मारहाण करून तिला विवस्त्र गावात फिरवण्यात देखील आले. हा व्हिडिओ शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती महिला रडत असून मला जाऊ द्या असं म्हणत ओरडताना दिसत आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून सांगितलं की, सुसंस्कृत समाजामध्ये अशा गुन्हेगारांना स्थान नाही. या गुन्हेगारांना लवकरात लवकर तुरुंगात टाकण्यात येणार असून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल.