टाइम्स मराठी । आंध्र प्रदेशामधील तिरूमला पर्वतावर असलेल्या श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या नावाने वेगवेगळ्या बँकेमध्ये तब्बल 17000 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती तिरूमला तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही धर्मा रेड्डी यांनी यांनी दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेमध्ये त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून भगवान बालाजीच्या मंदिरासंबंधित वेगवेगळी आकडेवारी जाहीर केली. टीटीडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिजोरी मध्ये असलेल्या मौल्यवान रत्नांचे वजन हे 11 टन एवढे असून वेगवेगळ्या बँकांमध्ये ते जमा करण्यात आलेले आहे. तिरूमला पर्वतावरच्या मुख्य देवतेच्या संपत्तीमध्ये 1.2 टन वजनाचे सोन्याचे दागिने तर 10 टन चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानाचे वार्षिक बजेट पाहिले तर दरवर्षी 100 कोटी रुपयांची वाढ होत असते. 2009-10 मध्ये 1365.05 कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटला देवस्थानाचे तत्कालीन अध्यक्ष डी के आदिकेसावुलू नायडू यांनी मंजुरी दिली होती. तेव्हा सुमारे 50,000 भाविक तीर्थक्षेत्राला भेट देत होते. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.भाविकांनी दान केलेले डोक्यावरचे केस, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, दर्शनासाठी विक्री केली जाणारी तिकीट, प्रसादाचे लाडू विक्री आणि भाविकांच्या राहण्या साठी रूम उपलब्ध करणे, भाविकांनी केलेलं दान हे सर्व मिळून देवस्थानाच्या उत्पन्नामध्ये भर पडत असतो.
यापूर्वी 2011- 12 मध्ये 555 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. त्यानंतर 2011 12 यावर्षी 1661.66 कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटला मंजुरी देण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊन मुळे भाविकांना देवदर्शनासाठी येण्यास बंदी होती. त्यामुळे देवस्थानाला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली. 2020 -21 मध्ये 13०० कोटी रुपये उत्पन्न मिळावे ही अपेक्षा होती पण त्यावेळी फक्त 721 कोटी रुपये मिळाले. या काळामध्ये 2837 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले होते. 2023-24 यावर्षी 4411.68 कोटी रुपयाच्या वार्षिक बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.
टीटीडीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 17000 कोटी रुपये आणि 11 टन सोने वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तिरूमालेच्या सजावटीसाठी प्रत्येक वर्षी 500 टन फुलांचा वापर केला जातो. या सोबतच मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी दररोज 800 कर्मचारी ड्युटीवर तैनात करण्यात येतात. श्रीवरी मंदिरामध्ये प्रसाद बनवण्यासाठी दरवर्षी 5000 टन तूप वापरले जात असल्याचे देखील टीटीडीने उघड केले आहे. या मंदिरामध्ये सध्या 24 हजार 500 कर्मचारी सेवा देत आहे.