टाइम्स मराठी । टोयोटा कंपनीने आजवर अनेक जबरदस्त गाड्या तयार केल्या आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गाड्यांच्या निर्मितीमुळे टोयोटा कंपनी नेहमीच लोकप्रिय ठरली आहे. आता या कंपनीने खूपच खास आणि अनोखा असे क्रूझर मॉडेल तयार केलं आहे. विशेष म्हणजे, या क्रुझरला चंद्रावर जाण्यासाठी आणि तेथेच राहण्यासाठी तयार करण्यात आले आहे. नुकतीच टोयोटा कंपनीने या क्रूझरची माहिती दिली असून या क्रुझरची वैशिष्ट्य सांगितली आहेत. टोयोटाची ही गाडी पाण्यावर चालू शकते. त्यांसाठी पेट्रोल- डिझेलची गरज नाही.
टोयोटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पामधून लुनर रोव्हर तयार केले आहे. हे रोव्हर फक्त पृथ्वीवर चालण्यासाठी नाही तर चंद्रावर देखील फिरण्यासाठी बनवण्यात आले आहे. या रोव्हरसाठी कोणतेही पेट्रोल डिझेल असे इंधन न लागता ही गाडी चक्क पाण्यावर चालणारी आहे. या रोव्हारमुळे शास्त्रज्ञांना चंद्रावर राहून तेथील संशोधन करणे सोपे जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच हे रोव्हर चंद्रावरील नवीन गोष्टींचा शोध घेण्यासाठी मदत करेल.
पुढे कंपनीने सांगितले आहे की, एका विशेष मोहिमेअंतर्गत ही क्रूझर तयार करण्यात आली आहे. ही क्रूझर टोयोटा लँड क्रूझरसारखीच असणार आहे. लुनर क्रूझरमुळे लोक आरामात चंद्रावर जाऊन जेवण, काम, झोप आणि इतरांशी बोलू शकणार आहेत. तसेच, क्रूझरचा फायदा चंद्रावरील शोध मोहीम करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे, चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी चीनच्या चांगई 5 आणि भारताच्या चंद्रयान 2 प्रमाणेच लुनर क्रूझर ही एका मोहिमेचा भाग असणार आहे. खास म्हणजे, ही क्रूझर इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करून त्याचे इंधनात रूपांतर करेल. या इंधन सेलमधून मिळणारी शक्ती रात्री वापरता येण्यास मदत होते. तसेच, या क्रूझरमधील फीचर्स मानवाला चंद्रावर जास्त दिवस राहण्यास मदत करतील.
दरम्यान, यापूर्वी देखील अशाच एका मोहिमेदरम्यान पाठवण्यात आलेल्या रोव्हर्सने इंधन म्हणून सौर ऊर्जेचा वापर केला होता. परंतु चंद्रावरील रात्रीचा कालावधी सुमारे 14 दिवसांचा असल्यामुळे सौरऊर्जेपासून वीजपुरवठा करणे कठीण झाले. त्यामुळे आता नवीन तयार करण्यात आलेल्या रोव्हरमध्ये या सर्व बाबींचा अभ्यास करून फीचर्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रावर पाठवण्यात आलेल्या इतर मोहिमांप्रमाणेच ही मोहीम देखील यशस्वीरित्या पार होईल असा विश्वास टोयोटा कंपनीने दाखविला आहे.