Viral Video: बायकोचं झाल प्रमोशन; नवऱ्याने ढोल ताशांच्या गजरात व्यक्त केला आनंद

टाइम्स मराठी | कोणतीही चांगली गोष्ट केली तरी नवऱ्याकडून कौतुक होत नसल्याची तक्रार अनेक महिलांकडून ऐकायला मिळत असते. परंतु हैदराबादमधील कंपी दीना हिच्या नवऱ्याने बायकोसाठी कौतुकाने असे काही केले आहे की, याची चर्चा राज्यात सर्वत्र होऊ लागली आहे. कंपी दीनाचे हेड कॉन्स्टेबल पदावर प्रमोशन झाल्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजेच रोनल बसिलने ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून तिचे स्वागत केले आहे.

   

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत कंपी दीना आणि रोनल बसिलचे अभिनंदन केले आहे. तसेच नवरा म्हणून रोनलचे देखील नेटकरी कौतुक करत आहेत. रोनल सारखा नवरा प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यात असावा अशा प्रतिक्रिया अनेक महिलांनी या व्हिडिओवर दिल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, कंपी दीना आणि रोनल बसिल दाम्पत्य इरागड्डा येथील रहिवासी आहे. दीना ही तेलंगणा पोलीस खात्यात नोकरीला आहे. नुकतेच तिने आपल्या 18 महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून 45 दिवसांचे पोलीस ट्रेनिंग पूर्ण केले आहे. अशा स्थितीत ट्रेनिंगसाठी जाणे हे तिच्या मनाला देखील पटणारे नव्हते. मात्र रोनलने तिला धीर देत स्वप्न पुर्ण करण्यासाठी जायला सांगितले.

कंपी दीनाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिची बदली संजीवा रेड्डी नगर येथील पोलीस स्टेशन परिसरात झाली आहे. खास म्हणजे, यावेळी तिला हेड कॉन्स्टेबल पदावर बढती मिळाली आहे. त्यामुळे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ज्यावेळी दिना घरी आली तेव्हा तिचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. तिच्या नवऱ्याने ढोल ताशा वाजवत बायकोच्या प्रमोशनचा आनंद व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, फटाके फोडत डान्स करत रोनल बसिल ने उत्साह साजरी केला. यानंतर दीनाचे स्वागत केल्यानंतर सेलिब्रेशन केक कापण्यात आला. हे सर्व पाहून दीनाला देखील तितकाच आनंद झाला. दरम्यान, रोनल बसिल हा सिव्हील इंजिनिअर आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने साजरी केलेल्या उत्साहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.