पितृपक्षाचे अध्यात्म शास्त्रात नेमके काय महत्त्व आहे? पितृश्राद्ध पिंड दान कशाप्रकारे केले जाते?

टाइम्स मराठी | मित्रांनो अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे भाद्रपद पौर्णिमे नंतरच पितृ श्राद्ध सुरू होते. या पितृ श्राद्धमध्ये आपले जे पूर्वज असतात, त्यांच्या नावाने श्राद्ध घातले जाते. त्यांना या संपूर्ण महिन्यांमध्ये वेगवेगळ्या तिथीनुसार त्यांचे स्मरण केले जाते व आपल्या ऐपतीप्रमाणे पिंडदान देखील केली जाते. या पितृश्राद्ध महिन्यामध्ये पिंड दानाला खूपच महत्त्व आहे. या पिंडदाण्याच्या निमित्ताने आपण आपल्या पूर्वजांना गोडधोड नैवेद्याचे पदार्थ अर्पण करत असतो आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करत असतो. जसे मानवी जीवन मंगलमय होण्यासाठी देवी देवता यांचा आशीर्वाद उपयुक्त ठरतो, त्याच पद्धतीत आपल्या पितरांचा शुभ आशीर्वाद असेल तर आपले जीवन कल्याणमय होते. आपल्याला कोणत्याही गोष्टींची कमतरता कधीच निर्माण होत नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पितृश्राद्धात पिंडदानाचे नेमके काय महत्त्व असते याबद्दल सांगणार आहोत.

   

पितृ पक्षाला पितृ श्राद्ध असे देखील म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये या पितृपक्षाला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. अनंत चतुर्दशीच्या नंतर येणारा पंधरवडा हा पितृ श्राद्ध कालावधी मानला जातो. या कालावधीमध्ये आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा अर्चना व वेगवेगळ्या विधी केल्या जातात. या कालावधीमध्ये गाय, कुत्रा, मांजर, कावळा यांना नैवेद्य देखील दिले जाते. या कालावधीमध्ये केलेले अन्नदान येथेच पितरांपर्यंत पोहोचते व पितरांच्या आत्म्याला शांती लाभते. पितरांची चांगली शक्ती आपल्याला प्राप्त होते. जर आपल्यावर आपले पितर नाराज असतील तर त्यांचा क्रोध आपल्याला सहन करावा लागतो म्हणूनच या पंधरवड्यामध्ये पितरांच्या आत्म्याला शांती देण्याकरिता विविध पूजा अर्चना देखील केल्या जातात.

हिंदू धर्मशास्त्रांमध्ये आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा तसेच देवपूजा करणे आधी इतरांना नमस्कार करावा असे देखील सांगण्यात आलेले आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा उद्धार कशाप्रकारे होईल याचा विचार देखील करत असतो. प्रतिपदे पासून ते अमावस्या पर्यंत मृत्यू तिथीनुसार प्रत्येक जण आपल्या पितरांचे श्राद्ध विधी पार पाडत असतात. जर एखाद्या व्यक्तीची मृत्यू तिथी आपल्याला माहिती नसेल तर अशावेळी त्या व्यक्तीचे श्राद्ध हे सर्वपित्री अमावस्याला केले जाते आणि त्या व्यक्तीच्या आत्म्यासाठी शांती लाभण्यासाठी प्रार्थना देखील केली जाते. दिवसानुसार पितरांसाठी त्यांच्या आवडत्या पदार्थांचे नैवेद्य देखील दाखवले जाते. हे पितर त्यांच्या आवडीचे पदार्थ सेवन करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असे देखील धर्मशास्त्रा मध्ये सांगण्यात आलेले आहे.

तसे पाहायला गेले तर श्राद्ध म्हणजे दिवंगत व्यक्तीचे श्रद्धेपूर्वक केलेले स्मरण होय. श्राद्ध करत असताना व्यक्तीच्या नावाने पिंड देखील बनवले जातात. हे पिंड भाताच्या द्वारे बनवले जातात. शिजवलेल्या भाताचे गोळे बनवून नैवेद्य समजून पितरांसाठी ते दिले जातात. कधी कधी कणकेचे गोळे देखील पिंड म्हणून वापरले जातात. या पिंडाची विधिवत पूजा केली जाते आणि आपल्या पितरांसाठी व त्यांच्या मोक्ष गतीसाठी प्रार्थना केली जाते.