समूह भावनेने समस्येवर काम करणे काळाची गरज… : दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया

छत्रपती संभाजीनगर : आज समाजामध्ये व्यवस्थेविरुद्ध लढण्याची सामूहिक आणि संघटनात्मक भावना राहिलेली दिसत नाही. सगळी लोकं छोट्या – छोट्या गटांमध्ये विभागली गेली असल्यामुळे समकालीन काळामध्ये एखाद्या व्यक्तीची समस्या ही समाजाची किंवा इतर व्यक्तीची समस्या असल्याची भावना निर्माण होताना दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीला अँग्री यंगमॅन हे उत्तर नसून समूह भावनेने समस्येवर काम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक व अभिनेता तिग्मांशू धुलिया यांनी यावेळी केले.पानसिंग तोमर चित्रपटाचे दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया यांच्याशी आज दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित मास्टर क्लासमध्ये साधला संवाद.

   

पुढे बोलताना धूलिया म्हणाले, अलाहाबाद सध्याचे प्रयागराज या शहराने देशाला आजपर्यंत अनेक प्रधानमंत्री आणि भारतरत्न दिले असून हे शहर म्हणजे महान व्यक्तिमत्वांचे शहर आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असणारे हे शहर असून देशभरातील सर्व भागांतून असंख्य लोकं येथे आलेले आहेत. माझ्या जडणघडणीत या शहराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. या शहरातून स्वातंत्र्य आणि काहीतरी प्रतिभासंपन्नतेच्या शोधात मी बाहेर पडलो. या दरम्यान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे मी भेट दिली आणि इथे मला जे पाहिजे होते ते पाहायला मिळाले. आणि मी ठरवले की, हीच ती जागा असून वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी एनएसडीमध्ये दाखल झालो.

लहानपणापासून मी चित्रपट पाहत आलो असून मात्र, त्यावेळी इतके काही त्यातील काही कळत नव्हते. आठ वर्षाचा असताना मी शोले हा चित्रपट उभा राहून पाहिला होता. मला लहानणापासूनच ॲक्शन चित्रपट आवडत आलेले आहेत. मला कधी सामाजिक आणि प्रेमाची चित्रपटे आवडली नाहीत असे दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया यांनी यावेळी सांगितले.

दिग्दर्शक धूलिया पुढे म्हणाले, सध्या कोलकत्ता आणि चेन्नई ही शहरे सोडली तर देशातील सगळी शहरे एकसारखी दिसत आहेत. सगळ्या शहरांची आपली असलेली एक वेगळी ओळख संपलेली आहे. सगळीकडे आता तेच मल्टिप्लेक्स आणि तेच मॉल झालेले आहेत. या पाठीमागे केवळ पैसा हे कारण असल्याचे मला वाटते. चित्रपट सृष्टिमध्ये सगळ्यांचा संघर्ष वेगवेगळा असतो, यामध्ये तुलना होऊ शकत नाही. मला अभिनेता आणि दिग्दर्शक याच्यामध्ये दिग्दर्शन करणे आवडते, केवळ पैसे मिळतात म्हणून मी अभिनय करतो. सगळ्यात सोपे काम अभिनय करण्याचे असून अभिनय हा कधीही परिपूर्ण असत नसून त्यात नेहमी सुधारणेला वाव असल्याचे तिग्मांशु धूलिया यांनी यावेळी सांगितले.