YouTube ची मोठी कारवाई!! भारतातील 22 लाख व्हिडिओ डिलीट; नेमकं कारण काय??

टाइम्स मराठी । जगातील सर्वात प्रसिद्ध विडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. YouTube ने भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत आणि लाखो चॅनेलवर सुद्धा बंदी घातली आहे. खरं तर YouTube ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत कम्युनिटी गाइडलाइंस अंमलबजावणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की यूट्यूबने जगभरातील अनेक देशांचे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत, परंतु सर्वाधिक संख्या भारतीय व्हिडिओंची आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे.

   

YouTube ने भारतातून एकूण 22,54,902 व्हिडिओ डिलीट केले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंगापूर मधून 12,43,871 व्हिडिओ आणि अमेरिकेतून 7,88,354 व्हिडिओ डिलीट करण्यात आलेत. कंपनीकडून जे विडिओ डिलीट केले आहेत त्यातील 96% व्हिडिओ ‘ऑटोमॅटिक फ्लॅगिंग’द्वारे ओळखले गेले होते, याचा अर्थ असा होतो की या व्हिडिओंचे परीक्षण मानवाने केले नाही तर मशीनद्वारे केले गेले. YouTube ने डिलीट केलेल्या एकूण व्हिडिओंपैकी 53.46 टक्के व्हिडिओंना फक्त एक व्ह्यू मिळाला होता. तर 27.07 टक्के व्हिडिओ असे होते की त्यांना 1 ते 10 व्ह्यूज मिळाले.

2 कोटी चॅनेल्सवरही बंदी –

इतकेच नाही तर, YouTube ने ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान आपल्या प्लॅटफॉर्मवरून 2 कोटींहून अधिक चॅनेल बंद केले आहेत. YouTube च्या स्पॅम धोरणांतर्गत या चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 39.4% व्हिडिओ धोकादायक किंवा हानिकारक असल्याचे आढळले, 32.4% व्हिडिओ मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काढून टाकण्यात आले. याशिवाय 7.5% व्हिडिओ हिंसक किंवा अश्लील असल्याचे आढळले. त्यामुळे असे चॅनेल्स बंद करण्याचा निर्णय युट्युबने घेतलाय.